मुंबई । राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. कॅज्युअल रजेच्या नियमांमध्ये शासनाने मोठा बदल करत रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या रजेसोबत जोडण्याची सवलत कायमस्वरूपी लागू केली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना सलग सुट्ट्यांचे नियोजन अधिक सुलभ होणार आहे.
वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय :
महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांनी जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या कॅज्युअल रजेच्या आधी (प्रिफिक्स), नंतर (सफिक्स) किंवा रजेच्या कालावधीत येणारे रविवार तसेच सार्वजनिक सुट्ट्या जोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
यापूर्वी 2 मार्च 1981 रोजी देण्यात आलेली ही सवलत तात्पुरत्या स्वरूपात होती. मात्र आता शासनाने तिला कायमस्वरूपी मान्यता दिली असून त्यासंदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
नवीन नियमांनुसार, कॅज्युअल रजा आणि त्यासोबत जोडलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांचा एकूण कालावधी साधारणपणे 7 दिवसांपेक्षा जास्त नसावा, अशी स्पष्ट मर्यादा घालण्यात आली आहे. तसेच, अत्यंत विशेष आणि अपवादात्मक परिस्थितीत ही मर्यादा कमाल 10 दिवसांपर्यंत वाढवण्याची तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. या निर्णयामुळे वैयक्तिक कामे, कौटुंबिक कार्यक्रम किंवा प्रवासाचे नियोजन अधिक सोपे होणार आहे. सलग सुट्ट्या घेणे आता नियमांच्या कचाट्यात अडकणार नसल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.















Discussion about this post