दिवाळीपूर्वी सप्टेंबरचा हप्ता मिळण्याची शक्यता; निधी वितरणासाठी शासनाची मान्यता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सप्टेंबर महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता कधी जमा होणार, याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने या योजनेअंतर्गत पात्र महिलांना लाभ देण्यासाठी ३४४.६२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सप्टेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. सप्टेंबर महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा न झाल्याने अनेक लाभार्थी महिला त्याची प्रतीक्षा करत आहेत. त्यातच दिवाळीचा सण जवळ आल्याने महिलांना हप्ता नेमका कधी मिळणार, याबाबत उत्सुकता होती.
आता राज्य सरकारने निधी वितरणास मंजुरी दिल्याने सप्टेंबर महिन्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, प्रत्यक्ष पैसे खात्यात जमा होण्याची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही. शासनाच्या निर्णयानुसार, अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र महिलांना योजनेचा लाभ देण्यासाठी ३४४.६२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीच्या माध्यमातून महिला व बालविकास विभागाच्या प्रशासकीय विभाग प्रमुख सचिवांकडे वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी यापूर्वीही सामाजिक न्याय विभागाच्या निधीचे पुनर्विनियोजन करण्यात आले होते. यावेळीही संबंधित निधीतून लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
महिलांना आता खात्यात पैसे जमा होण्याची प्रतीक्षा
सरकारकडून निधी वितरणास मंजुरी मिळाल्यानंतर आता लाभार्थी महिलांचे लक्ष प्रत्यक्ष पैसे खात्यात जमा होण्याकडे लागले आहे. दिवाळीच्या खरेदीसह घरखर्चासाठी या रकमेचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकर जमा होणार का, याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.














Discussion about this post