मुंबई । कुर्ला बेस्ट बस अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू तर ४९ जण जखमी झाले. या अपघाताचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. तपासातून उघड झालेल्या माहितीनुसार, चालक संजय मोरे हा १ डिसेंबर रोजी कंत्राटीपद्धतीने कामावर रूजू झाला होता. मोरया या कंपनीनेने बेस्टला हा चालक दिला होता. मोरया ही कंपनी बेस्टला चालक देण्याचे काम करते. रूजू झाल्यानंतर ३ महिन्यांचे ट्रेनिंग चालकाला दिले जाते पण संजय मोरे यांना ट्रेनिंग दिले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
संजय मोरेने ९ दिवसांत ४ वेळा मॅन्युअल बस चालवली असून सोमवारी दुपारी २ वाजता ड्यूटीवर आल्यानंतर ४ वाजता एक मॅन्युअल बस घेऊन तो निघाला. ती बस घेऊन तो ७:४५ च्या सुमारास पुन्हा कुर्ला आगारात आला. तिकडे एक तास आराम करून तो पुन्हा बस चालवायला निघाला. मात्र तेव्हा त्याला ऑटोमॅटीक बस चालवायला दिली. त्या बसचा अंदाज न घेता त्याने बस आगाराच्या बाहेर काढली. त्यानंतर ही अपघाताची घटना घडली.
पोलिसांनी इलेक्ट्रिक बस बनवणारी कंपनी आणि काही तज्ञांशी संवाद साधला. इलेक्ट्रिक बस पूर्णपणे सुस्थितीत आहे बसमध्ये कुठलाही बिघाड नसल्याचे समोर आले आहे. इलेक्ट्रिक बसमध्ये ब्रेक फेल झाल्यावर किंवा काही मोठा तांत्रिक बिघाड झाल्यास बस पुढे जात नाही असा तज्ज्ञांचा दावा आहे. बेस्टकडे असलेल्या इलेक्ट्रिक बसमध्ये ही व्यवस्था आहे त्यामुळे अपघातग्रस्त बसचे ब्रेक फेल झाल्याचा दावा खोटा असल्याची माहिती तज्ज्ञांनी पोलिसांना दिली.
दरम्यान, कुर्ला बस अपघातातील आरोपी संजय मोरेला ३ वाजता कुर्ला कोर्टात हजर करणार असल्याची पोलिसांनी दिली आहे. या अपघातामध्ये ४ पोलिस देखील जखमी झाले आहेत. अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू तर ४९ जण जखमी झाले आहेत. जखमींवर भाभा आणि सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे.
Discussion about this post