जळगाव | लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसेंनी भाजपात वापसी करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का बसला आहे. यातच शरद पवार गटाकडून रावेर लोकसभा मतदार संघातून उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असून यामुळे पक्षातील अंतर्गत कलह उफाळून आला आहे. श्रीराम पाटील यांच्या उमेदवारीला संतोष चौधरी आणि त्यांच्या सहकार्यांनी विरोध केला आहे.
संतोषभाऊंनी तर बंडाचे निशाण फडकावत लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची तयारी देखील सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगावात दाखल झाले आहेत.जिल्ह्यातील अंतर्गत कलहाबाबत ते नेत्यांसोबत खलबत करत असल्याची माहिती समोर आली आहे.
आज सकाळी जयंत पाटील यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केल्यानंतर ते जळगावातील एका हॉटेलमध्ये दाखल झाले. येथे त्यांनी स्थानिक नेत्यांसोबत विस्तृत चर्चा सुरू आहे. याप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्य रवींद्रभैय्या पाटील, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, रावेरातील पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील, महिला जिल्हाध्यक्षा वंदनाताई पाटील, महानगराध्यक्षा मंगलाताई पाटील, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, एजाज मलीक, रमेश पाटील, डॉ. चंद्रकांत बारेला आदींसह पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.