जळगाव । राज्यात पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ घातला आहे. सध्या महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असल्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान निर्माण झाले आहे. हवामान विभागाने रायगड, पुणे जिल्ह्याचा घाट विभाग आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला असून याच पार्श्वभूमीवर हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे.
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा म्हणजेच मान्सूनचा परतीचा प्रवास पश्चिम राजस्थानमधून सुरू झाल्याने महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, आज महाराष्ट्रातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट तर बहुतांश जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
रायगड, पुणे जिल्ह्याचा घाट विभाग आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः रायगड, पुणे घाटमाथा आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस
तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, जळगाव, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, सातारा घाटमाथा, बीड, बुलढाणा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, नंदूरबार, धुळे, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.















Discussion about this post