जळगाव । ईद, दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली. सणांच्या काळात रस्त्यांवरील वाढती गर्दी, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि अपघातांचा धोका लक्षात घेऊन जिल्हा पोलीस दल तसेच महामार्ग सुरक्षा पथकाने विविध ठिकाणी वाहन तपासणी केली. या विशेष मोहिमेत तब्बल ७ हजार १०५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, ५२ लाख ४५ हजार ५५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सणांच्या दिवसांत रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक कोंडी तसेच अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी सकाळपासून रात्री ११ वाजेपर्यंत विविध ठिकाणी तपासणी नाके आणि विशेष पथके तैनात केली होती. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने या कारवाईत सहभागी झाले. विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या ८५३ जणांवर, अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या ३८ जणांवर आणि बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या ५४१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ४२ चालकांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.
वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या चालकांवर पोलिसांनी कारवाई केली. ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या ५५९ जणांवर, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्या १२० चालकांवर आणि सिग्नल तोडणाऱ्या ४९ जणांवर कारवाई झाली. वाहनांमध्ये अनधिकृत बदल करून Modified Silencer वापरणाऱ्या १५ वाहनचालकांवर, आवश्यक दिवे अथवा रिफ्लेक्टर नसलेल्या ७९ ट्रकवर तसेच Wrong Side Driving करणाऱ्या ९ जणांवरही कारवाई करण्यात आली.
अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देण्याच्या प्रकारांवरही पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले. या मोहिमेत ५८ अल्पवयीन चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच विना परवाना शालेय वाहतूक करणाऱ्या ११२ वाहनांवर कारवाई करण्यात आली. शाळा आणि महाविद्यालय परिसरातील नियमभंगाच्या १९७ प्रकरणांमध्ये तसेच MIDC परिसरातील १० प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. याशिवाय इतर मोटार वाहन कायद्यांतर्गत २ हजार ८५४ प्रकरणे नोंदविण्यात आली.
जिल्हा पोलीस दलाची ५,६७० प्रकरणांत कारवाई
या मोहिमेत जळगाव जिल्हा पोलीस दलाने ५ हजार ६७० प्रकरणे निकाली काढत ३९ लाख ७० हजार १५० रुपयांचा दंड वसूल केला. तर महामार्ग सुरक्षा पथकाने १ हजार ४३५ प्रकरणांमध्ये कारवाई करत १२ लाख ७५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. अशाप्रकारे दोन्ही यंत्रणांनी मिळून ७ हजार १०५ प्रकरणांमध्ये कारवाई केली असून, एकूण दंडाची रक्कम ५२ लाख ४५ हजार ५५० रुपये इतकी आहे. या कारवाईचे सर्व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष निरीक्षण केले. पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, वाहतूक शाखा तसेच महामार्ग सुरक्षा पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला. सणांच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची विविध प्रमुख रस्त्यांवर विशेष नजर होती.















Discussion about this post