जळगाव : शहरातील ममुराबाद रोडवर कावड यात्रेदरम्यान भरधाव ट्रकने भाविकांच्या गर्दीत घुसून दिलेल्या धडकेत एका ८ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली. अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने ट्रक पेटवून दिला, तसेच चालकाला पकडून मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ममुराबाद रोडवरून कावड यात्रा शांततेत मार्गस्थ होत होती. याचवेळी मागून आलेल्या भरधाव ट्रकने यात्रेतील भाविकांना धडक दिली. या धडकेत एका ८ वर्षीय बालकाला ट्रकने सुमारे ५० मीटरपर्यंत फरफटत नेले. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
चिमुकल्याचा भीषण अपघात डोळ्यांसमोर घडल्याने उपस्थित भाविक आणि नागरिक संतप्त झाले. जमावाने ट्रकचालकाला पकडून त्याला मारहाण केली. त्यानंतर संतप्त नागरिकांनी ट्रकला आग लावली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले; मात्र जमावाच्या आक्रमक भूमिकेमुळे अग्निशमन दलाला काही काळ माघारी फिरावे लागल्याची माहिती आहे.

दरम्यान, अपघातानंतर संतप्त नागरिकांनी मृत बालकाचा मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे ममुराबाद रोडवरील वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त वाढविला. पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.
पोलिसांनी जळालेल्या ट्रकची आग विझवून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून, अपघात नेमका कसा घडला, ट्रकचा वेग किती होता आणि चालकाविरोधात कोणती कारवाई केली जाणार, याकडे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे कावड यात्रा व गर्दीच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.














Discussion about this post