जळगाव । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली असून महाविकास आघाडीतील शरद पवार गट व उद्धव सेनेकडून दावा असलेल्या जळगाव शहर आणि ग्रामीण मतदारसंघात मेरीटचा उमेदवार उभा करण्यासाठी उमेदवारांची अदलाबदली होण्याची शक्यता आहे.
जळगाव शहर मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे. मात्र, जळगाव ग्रामीणमध्ये मागील पाच वर्षांपासून शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे विधानसभेची तयारी करीत आहेत. ते शिंदे गटाचे विद्यमान आमदार व मंत्री गुलाबराव पाटलांचे या मतदारसंघातील पारंपरिक विरोधक आहेत. याठिकाणी उद्धव सेनेकडे गुलाबराव पाटलांना आव्हान देण्यासाठी तोलामोलाचा उमेदवार नाही. दुसरीकडे जळगाव शहर मतदारसंघात याउलट स्थिती आहे. भाजपचे आमदार सुरेश भोळे यांची हॅटट्रिक रोखण्यासाठी शरद पवार गटाच्या तुलनेत उद्धव सेनेकडे माजी महापौर जयश्री महाजन या सक्षम उमेदवार आहेत. त्यांनीही मागील पाच वर्षांपासून तयारी सुरू केली आहे.
जागा ठेवणार कायम
जागा व उमेदवारीचा पेच असल्याने आता जळगाव शहर व जळगाव ग्रामीण या जागांची अदला-बदली करण्याचा किंवा उमेदवारांना पक्ष बदलण्यास सांगून त्या त्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा पर्याय आहे. दोन्ही पक्षांनी आपल्या जागांवर दावा कायम ठेवल्याने आता जळगाव ग्रामीणमधून पवार गटाचे गुलाबराव देवकर हातात मशाल घेऊन, तर जळगाव शहरातून ठाकरे गटाच्या जयश्री महाजन या शरद पवार गटात जाऊन तुतारी फुंकण्याची शक्यता आहे.