जळगाव : पत्नी मुलांसह माहेरी तर आई गुजरात येथे गेली असताना एका तरुणाने घरात गळफास घेत आत्महत्या केली. सदरची घटना जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीत उघडकीला आली आहे.
जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीतील कैलास इंदल राठोड (वय ३४) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. कैलास हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. पत्नी, आई, एक मुलगी व दोन मुलांसह तो सुप्रिम कॉलनीत वास्तव्यास होता. दरम्यान घरी एकटेच असताना रविवारी सकाळी कैलास यांनी राहत्या घरात गळफास घेतला. दरवाजा अर्धा उघडा असल्याने शेजारच्यांना ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.
शेजाऱ्यांनी कैलास यांच्या काकांच्या घरी जाऊन सांगितल्यावर तत्काळ त्यांनी धाव घेत शेजारच्यांच्या मदतीने खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान घटनेची माहिती माहेरी गेलेल्या पत्नीला कळविताच त्या जळगावी आल्या. पतीचा मृतदेह पाहून पत्नीने आक्रोश केला.
Discussion about this post