जळगाव : जळगाव जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच असून यातच मित्राची बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था पाहण्यासाठी जळगावला येत असताना वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे मोहित संजय मोरे (२०, रा. उमाळा ता. जळगाव) हा तरुण ठार झाला. तर इयत्ता बारावीचा विद्यार्थी गौरव अशोक पाटील (१८, रा उमाळा) जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना शहरातील एमआयडीसी परिसरातील रेमंड चौफुली जवळ घडली. उमाळा गावातील गौरव पाटील याची आज म्हणजेच मंगळवारपासून बारावीची परीक्षा असल्यामुळे जळगावात बैठक व्यवस्था पाहण्यासाठी गौरव सोबत मोहित मोरे हा जळगाव येत होता. सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास हॉटेल जवळ आले असताना त्यांच्या दुचाकीला एका वाहनाने मागून धडक दिली.
त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोहितचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत मोहीत हा फार्मसीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.
Discussion about this post