जळगाव । जळगाव शहातील महामार्गावर आज पुन्हा अपघात झाला असून यात भरधाव कारने वृद्धाला जबर धडक दिली. या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, महामार्गावर दोन दिवसापूर्वी ट्रकने १७ वर्षीय मुलीसह ३२ वर्षीय महिलेला चिरडल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकाचा बळी गेला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी आहुजानगर जवळ रास्ता रोको आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला आहे. यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
अजबसिंग नारायण पाटील (वय ७८, रा. द्वारका नगर, जळगाव, मूळ रहिवासी ता. यावल) असे मयत वृद्धाचे नाव आहे. ते द्वारका नगर येथे त्यांची मुलगी सुवर्णा मंगलसिंग पाटील यांच्याकडे राहत असून ते शनिवारी दि.३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेनंतर द्वारका नगर स्टॉपजवळ झाडाखाली असणाऱ्या पारावर बसण्यासाठी गेले होते.
मात्र यादरम्यान रस्ता ओलांडत असताना जळगाव करून एरंडोलकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्यांना जबर धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळेला द्वारका नगरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. घटना आजूबाजूच्या पंचक्रोशीत समजताच सर्व बाजूने नागरिकांनी महामार्गावर येऊन रास्ता रोको सुरू केला. यावेळी नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी दिली. यावेळी बांभोरी रस्त्यावरील जैन इरिगेशन कंपनीपर्यंत तर दुसऱ्या बाजूला शिव कॉलनीपर्यंत महामार्ग ठप्प करण्यात आलेला आहे.
Discussion about this post