जळगाव । शहरातील कालिंका माता चौक परिसरात भरधाव डंपरने एका वृद्धाला चिरडल्याची हृदयद्रावक घटना घडली. प्रभाकर रघुनाथ पाटील (वय ५७ रा. जुने जळगाव) असं मयताचे नाव असून घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करत तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला होता
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर पाटील हे बाजार करून भाजीपाला घेऊन घरी परतत होते. यावेळी कालिंका माता चौकातून जाणाऱ्या एका भरधाव डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, डंपरचे चाक थेट त्यांच्या चेहऱ्यावरून गेल्याने त्यांचा जागीच अंत झाला. विशेष म्हणजे, अपघात घडला तेव्हा डंपर चालक मोबाईलवर बोलण्यात व्यस्त होता, ज्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात घडला.
अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. गेल्या वर्षी याच ठिकाणी एका चिमुकल्याचा डंपरखाली चिरडून मृत्यू झाला होता, त्या आठवणी ताज्या झाल्याने नागरिकांचा संयम सुटला. संतप्त जमावाने अपघातग्रस्त डंपरच्या काचा फोडून त्याचे नुकसान केले. वाढता तणाव पाहता दंगा नियंत्रण पथक आणि शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली.
कालिंका माता चौक हा अपघातप्रवण क्षेत्र बनला असून येथे तातडीने अद्ययावत सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. तसेच या चौकात २४ तास वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, जेणेकरून अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहील, अशी आग्रही मागणी ललित नारखेडे व स्थानिक नागरिकांनी केली आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस पुढील तपास करत आहेत.















Discussion about this post