जळगाव जिल्ह्यात घरफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं दिसत असून अशातच यावल शहरातील विरार नगर परिसरामधील जिलेबी सेंटर चालकाचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनीतब्बल ५ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या कारवाईने खळबळ उडाली असून शहरातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, विरार नगर येथील रहिवासी शेख साबिर शेख प्यारेसाहब (वय ३४) हे आपला जिलेबी सेंटरचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजेच्या सुमारास ते घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. १७ फेब्रुवारी रोजी रात्री १०:०० वाजेच्या दरम्यान जेव्हा ते घरी परतले, तेव्हा त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले.
घरात प्रवेश केल्यानंतर शेख साबिर यांना धक्काच बसला. अज्ञात चोरट्यांनी केवळ दरवाजाचेच नाही, तर घरातील लोखंडी कपाटाचे देखील लॉक तोडले होते. चोरट्यांनी कपाटात ठेवलेली ५ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम (ज्यात ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांचा समावेश होता) आणि ३८ हजार रुपये किमतीचे ६.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स् (एरिंग) असा एकूण ५ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
याप्रकरणी शेख साबिर यांनी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी यावल पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ००४५/२०२६ दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.















Discussion about this post