बीड । बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या घटनेने बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सरकारची बाजू मांडून पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी करण्याची आणि नवीन पोलीस अधीक्षक नियुक्तीचे आदेश दिले होते. त्यानुसार, 24 तासात या पदावर नवनीत कॉवत यांची बीड पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
नवनीत कॉवत यांनी अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच संतोष देशमुख प्रकरणी काही आदेश दिले आहेत. “सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मी जातीने लक्ष घालणार आहे. याप्रकरणी जे कोणी आरोपी आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. येत्या दोन दिवसात मी पीडित देशमुख कुटुंबाला भेट देणार आहे. याप्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक कण्यात आली होती. तर तीन आरोपी फरार आहेत. आता फरार आरोपींना लवकरच अटक होईल”, असे बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितले.
“दहशत खपवून घेतली जाणार नाही”
“मी रात्री बीडमध्ये आलो आणि सकाळी रविवारीच्या दिवशी कामाला सुरुवात केली. पोलिसांना सुट्टी आणि रविवार नसतो. आता अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन मी सर्व निर्देश देणार आहे. बीड जिल्ह्यामधली दहशत खपवून घेतली जाणार नाही. बीड जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणणे हे माझे पहिले कर्तव्य आहे”, असेही नवनीत कॉवत म्हणाले.
“कुठल्याही आरोपीची गय केली जाणार नाही”
“बीडच्या नागरिकांनी दहशतीखाली वावरू नये. कुठलेही अडचण असल्यास 24 तास मला संपर्क करावा. बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना अलर्ट करण्यात आले आहेत. येत्या काही दिवसातच बीड जिल्हा हा गुन्हेगारीमुक्त करणार आहे. बीड जिल्ह्यात कुठल्याही आरोपीची गय केली जाणार नाही”, असेही आदेश नवनीत कॉवत यांनी दिले.
Discussion about this post