मुंबई । मुलं ही पालकांची कोणतीही खासगी मालमत्ता नसून, प्रौढ झाल्यानंतर त्यांना स्वतःच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा आणि जीवनसाथी निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. एका आईने आपल्या प्रौढ मुलीचा ताबा मिळावा यासाठी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.
नेमके प्रकरण काय?
नागपुरातील एक मुलगी १७ वर्षांची असताना शिक्षणासाठी घराबाहेर पडली होती. त्यानंतर ती एका तरुणासोबत निघून गेली. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेतला आणि तिला आईच्या ताब्यात दिले. मात्र, मुलगी १८ वर्षांची होऊन प्रौढ झाल्यानंतर तिने पुन्हा स्वतःच्या इच्छेने घर सोडले आणि संबंधित तरुणासोबत राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर मुलीचा ताबा मिळावा, यासाठी तिच्या आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली.याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने संबंधित मुलीशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी मुलीने आपण कोणाच्याही दबावाखाली नसून, स्वतःच्या इच्छेने आईची साथ सोडली असून संबंधित तरुणासोबतच राहण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट केले.
मुलीचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने तिच्या स्वेच्छेचा आणि प्रौढ व्यक्ती म्हणून असलेल्या कायदेशीर अधिकारांचा विचार केला. न्यायालयाने स्पष्ट केले की, मुलगी आता प्रौढ असून तिला आपल्या आयुष्याबाबत स्वतः निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यात स्वतःचा जीवनसाथी निवडण्याचाही अधिकार समाविष्ट आहे.केवळ पालक असल्यामुळे प्रौढ मुलाला किंवा मुलीला त्यांच्या इच्छेविरुद्ध स्वतःजवळ ठेवण्याचा अधिकार मिळत नाही. मुलांच्या ताब्याच्या प्रकरणात त्यांच्या कल्याणासोबतच त्यांची स्वतःची इच्छा आणि स्वायत्तता महत्त्वाची असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले.
आईची याचिका फेटाळली
मुलीने स्वतःच्या इच्छेने संबंधित तरुणासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाल्याने तिचा कोणत्याही व्यक्तीने बेकायदेशीर ताबा घेतल्याचे सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे आईने दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. या निकालातून प्रौढ मुला-मुलींना स्वतःच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा आणि महत्त्वाचे वैयक्तिक निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण संदेश न्यायालयाने दिला आहे.















Discussion about this post