मुंबई । महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले आहे. न्यायालयाने म्हटले की, राज्याचे मुख्यमंत्री मंत्र्याविरोधात बोलत नाहीत. ते इतके हतबल झालेले आहेत का? तुमच्यावर दबाव असेल पण माझ्यावर नाही. मी माझा आदेश जारी करणार, असा थेट इशाराच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जमादार यांनी दिला आहे.
शिवसेना आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले पुन्हा वादाच्या भोव-यात अडकले आहेत. महाडमधील राड्याच्या प्रकरणात त्यांचा मुलगा विकास गोगावले यांनी अटकपूर्वी जामिनासाठी अर्ज केलेला आहे. या राड्याच्या प्रकरणात विकास गोगावले हे आरोपी आहेत. परंतु पोलिसांनी त्यांना अजूनही ताब्यात घेतलेले नाही. हाच मुद्दा उपस्थित करत न्यायालयाने संताप व्यक्त केला. मंत्र्यांची मुलं गुन्हा करून मोकाट फिरतात, ते मंत्र्यांच्या संपर्कात राहतात. परुंतु ते पोलिसांना कसे सापडत नाहीत? असा थेट सवाल न्यायमूर्ती माधव जमादार यांनी उपस्थित केला.
तसेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? असा थेट सवालही उच्च न्यायालयाने केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एवढे हतबल आहेत का? ते एका मंत्र्याविरोधात काहीच बोलत नाहीयेत. तुमच्यावर दबाव असेल. पण माझ्यावर नाहीये. मी माझा आदेश जारी करणार आहे. आरोपी पोलीसांना शरण येणार की नाही हे सायंकाळी 5 वाजेपूर्वी सांगा अथवा आम्ही आदेश जारी करणार, अशी थेट सूचना उच्च न्यायालयाने राज्याच्या महाधिवक्त्यांना केली आहे. त्यामुळे आता काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post