गेल्या काही दिवसांपासून गगनभरारी घेणाऱ्या सोन्या-चांदीच्या दरांनी आज शुक्रवारी (३० जानेवारी ) अचानक मोठी घसरण झाली आहे. या अनपेक्षित घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले असले, तरी सामान्यांच्या आणि दागिने खरेदीदारांच्या चेहऱ्यावर मात्र हसू उमटले आहे. विशेषतः १ फेब्रुवारीच्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी बाजारपेठेत झालेली ही उलथापालथ अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
नेमके दर काय आहेत?
भारतीय वायदा बाजारात (MCX) आज शुक्रवारी सकाळी व्यवहार सुरू होताच चांदीच्या किमतीत ४.१८% ची मोठी घसरण नोंदवण्यात आली. काल ४ लाखांचा ऐतिहासिक टप्पा पार करणारी चांदी आज तब्बल २०,००० रुपयांनी कोसळून ३,८०,१८१ रुपये प्रति किलो वर आली आहे. तर २४ कॅरेट सोन्याचे दरही ३.०४% ने घसरले. काल १.८३ लाख रुपयांच्या घरात असलेले सोने आज ६,००० रुपयांनी स्वस्त होऊन १,७७,७१० रुपये प्रति १० ग्रॅम वर व्यापार करत होते.
दरम्यान वायदा बाजारात सकाळी घसरणीसह सुरु झालेला व्यवहार दुपारी अधिकच घसरला. दुपारी 3:55 च्या दरम्यान चांदीचे दर 60 हजार रुपयांनी कमी होऊन 3 लाख 39 हजार रुपयांवर व्यवहार करत होती. तर सोने 10 हजार रुपयांनी घसरून 1 लाख 59 हजार रुपयांवर व्यवहार करत होते. दरम्यान हे दर सातत्याने बदलत असतात.
घसरणीचे कारण काय?
अमेरिकन डॉलरमधील मजबुती आणि फेडरल रिझर्व्हच्या धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंवर दबाव वाढला आहे. दुसरीकडे १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार सोने-चांदीवरील आयात शुल्कात कपात करण्याची शक्यता आहे. या आशेने व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विक्री सुरू केली आहे.















Discussion about this post