जळगाव । जळगावच्या सुवर्णबाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहे. काल सोमवारी दोन्ही धातूंच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आज मंगळवारी सोन्याच्या दरात तब्बल २ हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात ५ हजार रुपयांची वाढ झाल्याने ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या जळगावात सोन्याचा दर जीएसटीसह १ लाख ४४ हजार २०० रुपयांवर पोहोचला आहे, तर चांदीचा दर प्रति किलो २ लाख ३४ हजार ८४० रुपयांवर गेला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे बाजारात अस्थिरता वाढली असून, दरात सतत बदल होत असल्याने खरेदीदार सावध भूमिका घेताना दिसत आहेत.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाच दिवस युद्ध थांबवण्याची घोषणा केल्यानंतर आखातात काही प्रमाणात शांतता निर्माण झाली आहे. या घडामोडींचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी मोठी घसरण झाल्यानंतर आता पुन्हा दर वाढल्याने सोन्या-चांदीच्या बाजारात अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे.
गेल्या काही आठवड्यांत सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी चढ-उतार झाले असून, अल्प कालावधीत झालेल्या या बदलामुळे ग्राहकांनी खरेदीबाबत सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय परिस्थिती स्थिर होईपर्यंत बाजारातील अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे.















Discussion about this post