जळगाव । जळगावातील जिल्हा पोलीस दलाच्या शासकीय वाहनांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंत्री महाजन यांना आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांचे तिकीट कापले जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
रक्षा खडसे यांना आगामी निवडणुकीत पुन्हा तिकीट मिळेल की नाही, याबाबत ठामपणे सांगता येणार नाही, भाजपमध्ये संसदीय मंडळ आहे. तिथूनच सर्व नावं ठरतात. त्यामुळे ऐन वेळेवर काय होईल हे सांगता येत नाही. असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले आहे.
मागच्या वेळेस तुम्ही पाहिला आहे, ऐन वेळेवर कसे तिकीट बदलतात.भाजपचे माजी खासदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे असतील, आमदार स्मिता वाघ असतील, तसेच खासदार उमेश पाटील यांचे उदाहरण असेल ऐनवेळी कशा पद्धतीने या उमेदवारांची तिकिटे कट करण्यात आली. त्यामुळे हा भाजपचा हायकमांडचा निर्णय आहे.
ऐनवेळी काहीही होऊ शकते, असे म्हणत रक्षा खडसे यांच्या लोकसभेच्या उमेदवारीबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी साशंकता व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना त्यांचे तिकीट कापण्यात आले होते. आता नाव न घेता मंत्री गिरीश महाजन यांनी खासदार रक्षा खडसेंच्या उमेदवारीबाबत सूचक विधान केले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांचे रावेर लोकसभा निवडणुकीत तिकीट कट होते का? की त्यांना पुन्हा उमेदवारी मिळते अशा चर्चेला मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिक्रियेवरुन उधाण आले असून आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Discussion about this post