जळगाव । राष्ट्रवादीच्या जळगावमध्ये आयोजित सभेत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात आता खोक्याचं राज्य सुरू झालेले आहे. पैसा, माज, मस्ती आली आहे. हा माज आणि मस्ती उतरवण्याची वेळ आली आहे, अशी टीका खडसेंनी केली होती. त्यांच्या या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
गिरीश महाजन म्हणाले, एकनाथ खडसे यांची मस्ती अजून जिरली नाही का? आमची मस्ती काढत आहात. दहा दहा मंत्रीपद घेताना तुम्हाला काही वाटलं नाही का? तुमची मस्ती लोकांनी आणि सर्व बांधकाम व्यावसायिकांनी पाहिली आहे. त्याची फळ तुम्ही भोगत आहात. आता उर बडवून काहीही उपयोग नाही.
गिरीश महाजन पुढे बोलताना म्हणाले की, 30-35 वर्षे तुम्ही भाजपात होता. सगळ्यात जास्त पदं तुम्ही भोगली आहेत. आता दोन वर्षात तुम्हाला आमची मस्ती दिसली का? तुमची मस्ती लोकांनी उतरवली आहे. तुमचा विधानसभेत पराभव केला, दूध संघ आणि बँकेतून तुम्हाला हाकललं, तुमचं काय राहिलं आहे. आम्ही आमच्या ठिकाणी योग्य आहोत, असे महाजन म्हणाले.
Discussion about this post