जामनेर । जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोराड गावात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून मुलगी झाल्याच्या रागातून स्वतःच्या पित्याने तीन दिवसांच्या नवजात बालिकेची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी कृष्णा लालचंद राठोड (वय २६, रा. मोराड) असे आरोपीचे नाव असून त्याला आधीच तीन मुली आहेत. चौथ्यांदा मुलगा होईल या अपेक्षेत तो होता. मात्र १३ नोव्हेंबर रोजी त्याच्या पत्नीने पुन्हा एका मुलीला जन्म दिला. याच रागातून आरोपीने गुरुवार (दि.25 डिसेंबर) रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता घरात असलेल्या लाकडी पाट्याने तीन दिवसांच्या चिमुकलीच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात बालिकेचा जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर कुटुंबातील किंवा गावातील कोणाही व्यक्तीने फिर्याद दाखल करण्याची तयारी दर्शवली नव्हती. सुरुवातीला पावर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र तपासादरम्यान ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले.
पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार बाळकृष्ण शिंब्रे यांनी स्वतः फिर्याद दाखल केली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपी कृष्णा राठोड याला २५ डिसेंबर रोजी रात्री ८:५१ वाजता अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करत आहेत. स्वतःच्या पोटच्या गोळ्याची निर्घृण हत्या करणाऱ्या या घटनेमुळे समाजातील मुलगा-मुलगी भेदाची विदारक भयानक वास्तवता पुन्हा एकदा समोर आली आहे.















Discussion about this post