जळगाव । पाचोरा तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने आधीच परिस्थिती बिकट झाली आहे. अशातच रविवारी रात्री व आज सोमवारी सकाळी झालेल्या जोरदार पावसाने पुन्हा हाहाकार माजला आहे. जोरदार पाऊस झाल्याने एका शेतकऱ्याचा नाल्याच्या पुरात वाहून गेल्यानं मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय.
वरखेडी येथील रहिवाशी सतीश मोहन चौधरी (३५) हे शेती सांभाळून पोस्टात टपाल वितरणाचे काम करत. रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी वरखेडी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर शेताजवळून वाहणाऱ्या नाल्यामुळे काही नुकसान झाले आहे का, हे पाहण्यासाठी ते सोमवारी सकाळी शेतात गेले होते.
दरम्यान, शेतात पोहोचत नाही तितक्यात पुन्हा जोरात पाऊस सुरू झाल्याने ते एका झाडाखाली काही वेळ थांबले. पाऊस थोडा कमी झाल्यावर सांगवी गावाच्या रस्त्यावरून वरखेडीकडे येण्यास निघाले. मात्र, सांगवी ते वरखेडी दरम्यानच्या नाल्यास अचानक मोठा पूर आल्याने ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. ग्रामस्थांना वरखेडी बाजारपेठेतील शनी मंदिराजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला.















Discussion about this post