जळगाव : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आला असून यावरून विरोधक राज्य सरकारला घेरत आहे. यातच मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सल्ला दिला आहे.
मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय सरकारने लवकर घ्यायला हवा. राज्यात तुमचं सरकार, केंद्रात तुमचं सरकार आहे. तर ५० टक्केच्या वर आरक्षण द्यावे. केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्ती करून ५० टक्केच्या वरती आरक्षण घोषित करावे; अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केंद्र सरकारला केली आहे.
मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने पुन्हा आंदोलन पुकारले आहे. यात जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेला लाठीमार हा अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आता राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ठोस भूमिका घ्यायला हवी; असेही एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
केंद्रात भाजपच सरकार आहे. राज्यातही त्याचं सरकार आहे. केंद्र सरकारने आता संसदेचे विशेष अधिवेशन बोलावलं आहे. याच अधिवेशनात कायद्यात दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कार्यवाही करावी; असे मत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज जळगावात व्यक्त केलं. लोकसंख्येच्या आधारावर ५० टक्केच्यावर आरक्षण देण्यासंदर्भात निर्णय व्हायला हवा. हे प्रकरण अधिक चिघळू न देता सरकारने विशेष अधिवेशनात हा मुद्दा निकाली काढावा; असेही खडसे यावेळी म्हणाले.
Discussion about this post