सोलापूर : पूर्वीची भाजप ही भ्रष्टाचारमुक्त आणि गुन्हेगारमुक्त अशा चौकटीतील होती, मात्र, आता जेलमध्ये जाऊन आलेले किंवा ईडी चौकशीत अडकलेले लोक पक्षात घेतले जात आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार आणि पूर्वाश्रमीचे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेतृत्वावर केली.
पंढरपूरमध्ये विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी एकनाथ खडसे आले होते, तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खडसे म्हणाले, ज्या भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात मी विरोधी पक्ष नेता असताना टीका केली होती, ते आज पक्षात असून 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, तेही आज यांच्यासोबत आहेत, असा टोला एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला. विशेष म्हणजे आजच त्यांच्या सुनबाई आणि केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यादेखील पंढरपूरमध्ये आल्या होत्या. त्या पंढरपुरातून गेल्यानंतर दुपारी एकनाथ खडसे हेही पंढरपूरमध्ये आले. यावेळी बोलताना, भाजप हा विषय माझ्यासाठी पूर्णपणे संपला असून मी अंधारात असताना मला साथ देणाऱ्या शरद पवार यांच्यासोबतच मी असणार असल्याचा पुनरुच्चार खडसे यांनी केला.
भाजपच्या या अवस्थेला राज्याचे नेतृत्व जबाबदार आहेत का असे विचारले असता खडसेंनी मात्र देवेंद्र फडणवीस यांना क्लीन चीट देत यासाठी त्यांना एकट्याला दोष देणे चुकीचे असल्याचे म्हटले. प्रक्रियेत असणारे सर्व आणि पक्षात प्रवेश देणारे संघटनेचे नेते यास जबाबदार असल्याचे खडसेंनी म्हटले. मी भाजपमध्ये असताना गिरीश महाजन माझा सामान्य कार्यकर्ता होता, मी मंत्री असताना त्याला मंत्रिमंडळात स्थान नव्हते. मी गेल्यावर तो कार्यकर्त्याचा मंत्री झाला, असे म्हणत गिरीश महाजन यांच्यावरही खडसेंनी टीका केली.
दरम्यान, भाजपच्या विरोधात दोन ठाकरेंनी एकत्र आलेच पाहिजे याशिवाय सत्ताधाऱ्यांना विरोध करणाऱ्या सर्वांनी एकत्र आल्यास आगामी निवडणुकात चांगले यश मिळेल असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.
Discussion about this post