मदुराई । तामिळनाडूमधील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वरिष्ठ अधिकाऱ्याला 20 लाख रुपयांची लाच घेताना दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाने रंगेहात पकडले. अंकित तिवारी असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. आत्तापर्यंत ईडीचे अधिकारी अनेकांच्या घरी धाड टाकत होते, मात्र आता ईडीच्या कार्यालयात धाड टाकल्याने जोरदार चर्चा होत आहे.
अंकित तिवारी हा मदुराई येथील ईडीच्या प्रादेशिक कार्यालयात तैनात होता यानंतर अंकित तिवारीशी संबंधित प्रकरणासंदर्भात मदुराईच्या ईडी कार्यालयावरही छापे टाकण्यात आले. या काळात ईडी कार्यालयाजवळ सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते. तामिळनाडूच्या इतिहासात पहिल्यांदाच एका ईडी अधिकाऱ्यावर अशाप्रकारे भ्रष्टाचार निर्मून पथकाच्या पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्याची घटना घडली आहे.
अंकित तिवारी या अधिकाऱ्याने एका सरकारी डॉक्टरशी संबंधित प्रकरणात बेहिशोबी मालमत्तेचा तपास करत होता. तिवारीने या प्रकरणात कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी त्याला 3 कोटी रुपये देण्यास सांगितले. यानंतर आपण आपल्या वरिष्ठांशी बोललो आहोत आणि त्यांच्या सूचनेनुसार त्याने 51 लाख रुपये घेण्याचे मान्य केले असल्याचे त्याला सांगण्यात आले. यानंतर 1 नोव्हेंबर रोजी कर्मचाऱ्याने अंकितला 20 लाख रुपये दिले. त्यानंतर तिवारीने कर्मचार्याला व्हॉट्सअॅप कॉल आणि टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून 51 लाखांची संपूर्ण रक्कम द्यावी, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी दिली.
यानंतर सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्यावर संशय आला. सरकारी कर्मचाऱ्याने गुरुवारी ईडी अधिकाऱ्याविरुद्ध दिंडीगुल जिल्हा दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक युनिटकडे तक्रार दाखल केली. यानंतर शुक्रवारी DVAC अधिकाऱ्यांनी अंकित तिवारी याला तक्रारदाराकडून 20 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.















Discussion about this post