मुंबई । एकीकडे शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये भारतीय शेअर बाजारात मोठी वाढ झाली. कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल १३ टक्क्यांनी वाढ झाली. आता, कंपनीशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने रिलायन्स पॉवरचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) अशोक कुमार पाल यांना लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. अशोक कुमार पाल यांना अनिल अंबानी यांचा विश्वासू म्हणून ओळखलं जातं. मिळालेल्या माहितीनुसार, पाल याची दिल्लीमधील केंद्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली. रिलायन्स पॉवर संदर्भातील बनावट बँक हमी आणि बनावट कागदपत्राच्या प्रकरणात पॉलची कसून चौकशी झाली. त्यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या
नेमका आरोप काय आहे ?
अशोक कुमार पाल हे रिलायन्स पॉवर लिमिटेडमध्ये सीएफओ (कार्यकारी संचालक आणि मुख्य वित्त अधिकारी) म्हणून कार्यरत आहेत. ईडीकडून अशोक पाल यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. सोलर एनर्जी कॉरपोरेशन ऑफ इंडिया (SECI) ला ६८ कोटींपेक्षा अधिक बनावट बँक हमीची कागदपत्रे जमा करण्यात आल्याचा आरोप ईडीने केलाय. बनावट चलानच्या माध्यामातून पैशांची फेरफार करण्यात आली. त्याशिवाय एसबीआय, इंडियन बँक, पीएनबी आणि यूनियन बँक ऑफ इंडिया यासारख्या बँकेचे नाव घेऊन घोटाळा करण्यात आला. त्याशिवाय बनावट ईमेल डोमेन वापरून बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा आढळलेय.
ईडीच्या आरोपानुसार, अशोक पाल याने अनिल अंबानींच्या एका सहकाऱ्यांच्या मदतीने बनावट हमी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याशिवाय बिस्वाल ट्रेडलिंक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची करारासाठी निवड करण्यात आली. या कंपनीकडे कोणताही ट्रॅक नव्हता. तरीही त्या कंपनीची निवड करण्यात आली. बँकिंग व्यवस्थेचा गैरवापर करण्याचं हे रॅकेट असल्याचे तपासात समोर आलेय. सरकारी प्रकल्पातील निधी खासगी फायद्यासाठी वळवण्याचा प्रयत्न झाल्याचेही तपासातून समोर आलेय. ईडीच्या मते, बीटीपीएलचे संचालक पार्थ सारथी बिस्वाल आधीच न्यायालयीन कोठडीत आहेत.















Discussion about this post