नवी मुंबईतील सरकारी जमिनीशी संबंधित कथित घोटाळा समोर आला असून या प्रकरणात भाजप नेते जे. एम. म्हात्रे यांचे नाव पुढे आले आहे. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) धडक कारवाई करत तब्बल ७० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. मनी लाँड्रिंग अर्थात पैशांची अफरातफर प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
ईडीने केलेल्या कारवाईत भाजप नेते जे. एम. म्हात्रे यांच्या मालकीचे सुमारे १८ कोटी रुपये किमतीचे जमिनीचे भूखंड (Land Parcels) जप्त करण्यात आले आहेत. या भूखंडांचा संबंध नवी मुंबईतील सरकारी जमिनीच्या व्यवहाराशी असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण ७० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी जमिनींचा गैरवापर करून त्यातून मिळालेल्या रकमेचा वापर विविध मार्गांनी करण्यात आला असल्याचा आरोप आहे. या व्यवहारांमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, त्याच अनुषंगाने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (PMLA) ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून संबंधित व्यवहार, आर्थिक देवाणघेवाण आणि अन्य व्यक्तींची भूमिका याबाबत ईडीकडून सखोल चौकशी केली जात आहे. पुढील काळात आणखी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, नवी मुंबईतील सरकारी जमिनींच्या व्यवहारांबाबत नव्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.















Discussion about this post