जळगाव । जळगाव एमआयडीसी पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्याला एकाला अटक केली असून त्याच्याकडून १५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. विक्की नंदलाल भालेराव (वय २८, रा. वाघ नगर, जळगाव) असं दुचाकी चोरट्याचे नाव आहे.
जळगाव जिल्ह्यात मोटार सायकल चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी चोरीच्या घटना उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील गुन्हे शोध पथकाने कार्यवाही सुरू केली होती.
माहितीवरून एकाला घेतले ताब्यात
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रदीप चौधरी यांना बातमी मिळाली की, एक व्यक्ती एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीची मोटार सायकल घेऊन फिरत आहे. त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, प्रदीप चौधरी, विकास सातदिवे, रतन गिते, राहुल घेते, योगेश बारी आणि योगेश घुगे यांच्या पथकाने त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव विक्की नंदलाल भालेराव असे सांगितले. त्याने सागर पार्क येथून मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली.
१५ दुचाकी केल्या हस्तगत
पोलिसांनी विक्की भालेराव याला अटक करून न्यायालयातून पोलीस कोठडी घेतली. अधिक चौकशीत त्याने जळगाव शहर, जिल्हा पेठ, रामानंद नगर, एमआयडीसी आणि मोहाडी (धुळे जिल्हा) परिसरातून १५ मोटार सायकल चोरल्याची माहिती दिली. ज्याची किंमत ७ लाख ५० हजार रुपये आहे. या कारवाईत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हे, जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये ३, रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये ३ आणि मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये १ गुन्हा उघडकीस आले आहे. इतर मोटार सायकलबाबत अधिक तपास सुरू आहे.
Discussion about this post