धुळे । रेती वाहतुकीला परवानगी देण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या तलाठ्यासह दोन खासगी इसमांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. २५ हजार रुपयांची मागणी करून २० हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली होती. हीच रक्कम स्वीकारताना धुळे शहरातील गांधी पुतळा परिसरात तिघे एसीबीच्या जाळ्यात अडकले. या कारवाईमुळे धुळे जिल्ह्यातील रेती वाहतुकीच्या व्यवहारांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

एसीबीच्या माहितीनुसार, मोहित बाबासाहेब वारे (३९) हे सजा कुसुंबा येथील ग्राम महसूल अधिकारी असून, त्यांच्याकडे कौठाळ येथील अतिरिक्त कार्यभार आहे. तर प्रदीप विश्वास पाटील आणि स्वप्निल रामकृष्ण देसले हे दोन खासगी इसम या प्रकरणातील अन्य संशयित आहेत. तक्रारदार बांधकाम साहित्य वाहतुकीचा व्यवसाय करतात. त्यांच्या दोन मालवाहू वाहनांमधून पांझरा नदीपात्रातून रेती वाहतूक करून अमळनेर येथे रेती नेली जात होती.

याचदरम्यान प्रदीप पाटील याने तक्रारदाराशी संपर्क साधून आपण तलाठी मोहित वारे यांचे काम पाहत असल्याचे सांगितल्याचा आरोप आहे. रेती वाहतूक सुरू ठेवायची असल्यास तलाठ्यांशी बोलावे लागेल, अन्यथा वाहनांवर कारवाई होऊ शकते, असे सांगत पैशांची मागणी करण्यात आल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली.
प्रत्येक वाहनासाठी २५ हजारांची मागणी
२५ सप्टेंबर रोजी मोहाडी फाटा, कौठाळ येथे प्रदीप पाटील याने पुन्हा तक्रारदाराची भेट घेतली. तलाठी मोहित वारे यांचा निरोप असल्याचे सांगून पांझरा नदी, कौठाळ येथून रेती वाहतूक करण्यासाठी प्रत्येक वाहनामागे २५ हजार रुपये देण्याची मागणी केल्याचा आरोप आहे.यापूर्वी केलेल्या रेती वाहतुकीबाबत कारवाई करण्याची धमकी देऊन पैसे देण्यासाठी दबाव आणल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले.
तक्रार मिळताच एसीबीचा सापळा
तक्रारदाराने २८ सप्टेंबर रोजी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर तलाठी मोहित वारे यांनी २५ हजार रुपयांची मागणी केली असून, तडजोडीनंतर २० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे एसीबीच्या तपासात प्रथमदर्शनी निष्पन्न झाले.प्रदीप पाटील हा या व्यवहारात मध्यस्थी करत असल्याचेही तपासात समोर आले. त्यानंतर एसीबीने सापळ्याची तयारी केली.
लाच घेताच तिघेही एसीबीच्या ताब्यात
ठरल्याप्रमाणे गांधी पुतळा परिसरात तक्रारदाराकडून तलाठी मोहित वारे यांनी २० हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर ही रक्कम स्वप्निल देसले याच्याकडे देण्यात आली.देसले याने रक्कम स्वीकारताच आधीपासून सापळा रचून बसलेल्या एसीबीच्या पथकाने कारवाई करत तलाठी मोहित वारे यांच्यासह प्रदीप पाटील आणि स्वप्निल देसले या तिघांना ताब्यात घेतले.ही कारवाई नाशिक एसीबीच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा हांडोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस हवालदार संदीप हांडगे आणि पोलीस अंमलदार सुरेश चव्हाण यांचा समावेश होता. कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी केले.
या प्रकरणाचा पुढील तपास धुळे एसीबीच्या पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल करीत आहेत. तिघांविरोधात पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.















Discussion about this post