शिरपूर (धुळे) : धुळ्यातून लाचखोरीची एक मोठी बातमी समोर आलीय. विहिरीचे लाइन आउट करून देण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिरपूर पंचायत समितीचा कृषी विस्तार अधिकाऱ्यास धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. योगेशकुमार शांताराम पाटील (वय ४६) असे लाचखोर अधिकाऱ्याचं नाव असून या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे ही कारवाई करण्यात आली. दरम्यान तक्रारदार बुडकी (ता. शिरपूर) येथील रहिवासी असून त्याच्या आईच्या नावावर सांगवी (ता. शिरपूर) वनक्षेत्रात जमीन आहे. तेथे विहीर खोदण्यासाठी त्याने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत २०२२ मध्ये अर्ज केला होता. त्यात त्याला विहिरीसाठी चार लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले.
अनुदान मंजूर झाल्यानंतर कृषी विस्ताराधिकारी योगेश पाटील याने सिंचन विहिरीच्या नियोजित जागेची पाहणी करून तक्रारदार व त्याच्या आईचे छायाचित्र काढून नेले होते. यानंतर विहिरीचे लाइन आउट करण्यासाठी पाच हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी त्याने केली. याबाबत तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारीची खातरजमा करत पथकाने बोराडी येथील स्टेट बँक परिसरात सापळा रचला.
एसीबीकडून ताब्यात घेत गुन्हा दाखल
यानंतर कृषी विस्तार अधिकारी योगेशकुमार पाटील याने तक्रारदाराकडून पाच हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे कृषी विभागात खळबळ उडाली आहे. एसीबीने पाटील यास ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे विभागाचे उपअधीक्षक सचिन साळुंखे, निरीक्षक पंकज शिंदे यांच्या पथकाने केली आहे.
Discussion about this post