नवी दिल्ली । देशाच्या राजधानीत 27 वर्षानंतर भाजपची सत्ता आली आहे. यानंतर गेल्या 10 दिवसांपासून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरु होती. अखेर आज रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. रेखा गुप्ता यांच्यासह सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. रेखा गुप्ता यांच्यासह प्रवेश वर्मा, आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, कपिल मिश्रा, रवींद्र इंद्रराज आणि पंकज सिंग यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
रेखा गुप्ता यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक जिंकली आहे. त्या शालीमार बाग मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा 29 हजार 595 मतांनी पराभव केला. सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि आतिशी यांच्यानंतर रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीची कमान महिलेच्या हाती आली आहे. भाजपने मुख्यमंत्री म्हणून एका महिलेला संधी दिली आहे, पण मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही.
प्रवेश वर्मा
प्रवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत. प्रवेश वर्मा हे दोन वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार राहिले आहेत. प्रवेश वर्मा यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा ४ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. प्रवेश यांनी आरके पुरम येथील दिल्ली पब्लिक स्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण घेतले. यानंतर, त्यांनी किरोरीमल कॉलेजमधून कला शाखेत पदवी मिळवली.
कपिल मिश्रा
कपिल मित्रा हे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आम आदमी पार्टी सोडून भाजपत सहभागी झाले. त्यांनी करावल नगर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले.
मनजिंदर सिंग सिरसा
भाजपने राजौरी गार्डन विधानसभा मतदारसंघातून मनजिंदर सिंग सिरसा यांनी १८,१९० मते मिळवत ही जागा जिंकली. भाजपमध्ये येण्यापूर्वी ते शिरोमणी अकाली दल पक्षात होते. मात्र डिसेंबर २०२१ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला.
पंकज सिंह
पंकज सिंह हे पूर्वांचलचे ठाकूर आहेत. पंकज सिंह यांनी पहिल्यांदाच विकासपुरी मतदारसंघातून भाजपला पहिला विजय मिळवून दिला. पंकज कुमार सिंह यांनी आपचे महेंद्र यादव यांचा १२,८७६ मतांनी पराभव केला.
आशिष सूद
आशिष सुद यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जातात. दिल्लीतील पंजाबी समाजाचे आशिष सूद एक मोठा चेहरा असल्याचे मानले जाते. जनकपुरीमधून ते निवडून आले. आशिष सूद हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.
रवींद्र इंद्रराज सिंह
भाजपने दलित नेते रवींद्र इंद्रराज सिंह यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. रवींद्र इंद्रराज सिंह यांनी बवाना विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांनी आम आदमी पक्षाचे जय भगवान उपकर यांचा ३१,४७५ मतांनी पराभव केला.
दरम्यान, आज दिल्लीतील रामलीला मैदानावर दुपारी 12.35 वाजता शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांसह भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री आणि एनडीएचे सर्व मोठे नेते उपस्थित होते.
Discussion about this post