जळगाव : दीपनगर, भुसावळ येथील महावितरण कंपनीमध्ये कार्यरत असलेले अधीक्षक अभियंता भानुदास पुंडलिक लाडवंजारी (वय ५७, रा. नेहरुनगर जळगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना, २० नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल आहे.
तक्रारदारांचे मोठे विद्युत बिल दुरुस्त करण्याचे आणि त्यांचा वीज पुरवठा खंडित न करता कायम ठेवण्याचे काम अभियंता लाडवंजारी यांच्या अखत्यारीत होते. लाडवंजारी यांनी तक्रारदाराचे २ लाख ८८ हजार ५९४ रुपयांचे देयके दुरुस्त करण्याच्या मोबदल्यात बिलाच्या ५ टक्क्यांप्रमाणे लाच मागितली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बुधवार, १९ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
तक्रारीची सत्यता पडताळल्यानंतर, गुरुवार, २० नोव्हेंबर रोजी एसीबीने दीपनगर येथील महावितरणच्या त्यांच्या कार्यालयात सापळा रचला. लांडवंजारी यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच, एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले आणि तात्काळ अटक केली. पोलीस उपअधिक्षक योगेश ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली.















Discussion about this post