जळगाव । जळगावसह महाराष्ट्रातील काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला असून यामुळे बळीराजा पूर्णतः खचला आहे. अतिपावसामुळे जळगाव जिल्ह्यात कपाशी, सोयाबीन, ज्वारी, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. मात्र यात सर्वाधिक कपाशी पिकाचे नुकसान झाले असून, ‘पांढरे सोने’ काळवंडल्याने शेतकरी यंदा दिवाळी कशी साजरी करावी, असा प्रश्न नुकसानग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.
जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरमधील नैसर्गिक आपत्तीने ६० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील केळीसह कपाशी, सोयाबीन, ज्वारी, भाजीपाला पिकांची मोठी हानी झाली आहे. पैकी कपाशी लागवडीखालील शेतीचे सर्वाधिक ४७ हजार हेक्टरहून अधिक नुकसान झाले आहे. रोग व किडींचा विळखा, उत्पादनात घट, मजूर टंचाई आणि कमी भाव, या कारणांमुळे आधीच शेतकऱ्यांनी यंदा कपाशीची लागवड कमी केली आहे.
त्यात, बीटी बियाण्यासह रासायनिक खते, किटकनाशके आणि मशागतीवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केल्यावर शेतातील कपाशीचे पीक नैसर्गिक आपत्तीमुळे उद्धवस्त झाले आहे. दसरा झाल्यावर कापूस घरात येऊन दोन पैसे मिळतील आणि कुटुंबाची दिवाळी साजरी होईल, अशी आशा शेतकरी बाळगून होते. मात्र, पीक हाताशी येत नाही तितक्यात अतिवृष्टीसह नदी-नाल्यांच्या पुरामुळे क्षणात होत्याचे नव्हते झाले.
दुसरीकडे, काही ठिकाणी कपाशीचे पीक वाचले असले, तरी परिपक्व कैऱ्या आणि वेचणीवर आलेला कापूस पूर्णतः सडला आहे. कापूस आमच्यासाठी जीवन जगण्याचे प्रमुख साधन आहे. यंदाही कपाशी लागवडीवर हेक्टरी ३० ते ३५ हजार रूपये खर्च केले; परंतु, नैसर्गिक आपत्तीने मोठे नुकसान झाल्यानंतर आता कापसापासून १० रूपये सुद्धा येणार नाहीत, एवढी वाईट परिस्थिती आहे. पांढरे सोने काळवंडल्याने पोट भरावे कसे आणि दिवाळी साजरी करावी कशी, अशी चिंता वयोवृद्ध शेतकरी पांडुरंग देशमुख यांनी व्यक्त केली.















Discussion about this post