रावेर । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीय. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचा सावदा येथे बूथ मेळावा पार पडला. यावेळी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत रावेरची जागा काँग्रेसच लढवणार आणि जिंकणार असे काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. तसेच आता हवा बदलली आहे. २०२४ च्या निवडणुकीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम होईल, असेही थोरात म्हणाले
कोचुर रोडवरील मंगल कार्यालयात हा मेळावा झाला. बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर हल्ला चढवला. ते म्हणाले की, देशासाठी बलिदान करणारे काँग्रेसचे नेते होते. पण, आमच्या विरोधकांमध्ये एकही व्यक्ती देशासाठी बलिदान देणारी नाही. जाती-धर्मात फूट पाडून मतदान मिळवणे हे भाजपचे काम आहे. महाराष्ट्र सरकार शासन आपल्या दारी कार्यक्रमातून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत आहे. सर्वत्र दुष्काळी स्थिती आहे.
भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. तरीही सरकार लक्ष देत नाही. व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, संदीप पाटील, विनोद पाटील, रावेर तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, यावलचे प्रभाकर सोनवणे उपस्थित होते. सूत्रसंचालन धनंजय चौधरी यांनी केले.
आमदार शिरीष चौधरी म्हणाले की, राज्य सरकारने काँग्रेसच्या आमदारांची कामे अडवून धरली आहेत. दुसरीकडे हेच लोक काँग्रेसच्या आमदारांनी कामे केली नाहीत म्हणून त्यांना पाडा असा प्रचार मतदार संघात करतात. विरोधी पक्षाचे काही लोक आमच्याकडे या. आम्ही तुमची कामे करतो असे सांगतात. पण, आम्ही तसे करणार नाही. कारण, ही लढाई शेवटची आहे.















Discussion about this post