आज देशातील पाच राज्यांच्या (राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम) विधानसभा निवडणुकांचा निकाल लागत आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू असलेल्या मतमोजणीत सुरुवातीचे ट्रेंड समोर आले आहेत. यात तेलंगणातील विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल हाती येत असून सुरुवातीच्या आकडेवाडीनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे.
काँग्रेस ६५ जागांवर आघाडीवर असून बीआरएस ४२ जागांवर आघाडी घेत आहे. भाजपा ८ आणि एमआयएम २ जागांवर सध्या पुढे असल्याचे दिसून येत आहे. तेलंगणात केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीची सत्ता आहे. भाजपा आणि काँग्रेसची थेट बीआरएससोबत लढत आहे. तेलंगणातील जनतेने सत्तेच्या चाव्या कोणाकडे सोपवल्या याचा निर्णय आज होणार आहे. राज्यातील विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. यावेळी २२९० उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
तेलंगणात आम्ही पुन्हा जिंकू – के. कविता
आम्ही चांगलं काम केलंय, तेलंगणातील लोकांच्या आशीर्वादाने आम्ही पुन्हा एकदा सत्ता स्थापन करू, असा विश्वास तेलंगणातील बीआरएसच्या आमदार आणि मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांनी व्यक्त केला आहे.
२०२४ च्या लोकसभेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. गत २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत तेलंगणात चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसने ११९ पैकी ८२ जागा जिंकत बाजी मारली होती. मात्र, यंदाची परिस्थिती वेगळी असून बदलात्मक निकाल समोर येण्याची शक्यता आहे.
Discussion about this post