नवी दिल्ली । लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाने अविश्वास ठराव मांडत संसदेत राजकीय वातावरण तापवले आहे. विरोधकांना लोकसभेत बोलू दिले जात नाही, चर्चेला संधी नाकारली जाते आणि सत्ताधारी पक्षाला झुकते माप दिले जात असल्याचा आरोप करत काँग्रेसने नियम ९४(क) अंतर्गत हा अविश्वास ठराव सादर केला आहे.
या घडामोडीनंतर लोकसभेमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळाला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा हे सभागृहात आक्रमक झाले होते. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या खासदारांनी लोकशाहीचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप करत लोकसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
काँग्रेसकडून असा आरोप करण्यात आला की, महत्त्वाच्या विषयांवर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला जात असताना विरोधकांच्या नेत्यांना बोलण्याची संधी दिली जात नाही. सभागृहात चर्चेऐवजी वारंवार स्थगिती, भाषणांवर आक्षेप आणि मायक्रोफोन बंद करण्यासारख्या घटनांमुळे संसदीय लोकशाहीला धक्का बसत असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, सत्ताधारी पक्षाकडून या आरोपांचा इन्कार करण्यात आला असून लोकसभा अध्यक्ष नियम आणि परंपरेनुसारच कामकाज चालवत असल्याचे सांगण्यात येत आहे. अध्यक्षपद हे निष्पक्ष असून विरोधकांकडून अनावश्यक राजकारण केले जात असल्याचा दावा सत्ताधारी खासदारांनी केला आहे.
या अविश्वास ठरावामुळे संसदेच्या कामकाजावर काय परिणाम होणार, ठराव स्वीकारला जाणार की नाही, तसेच पुढील चर्चेची दिशा काय असेल, याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post