मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या असून यामुळे संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू आहेत. मात्र आचारसंहितेचा पहिला फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे.
वादग्रस्त वक्तव्या प्रकरणात निवडणूक आयोगाकडून शिवसेना शिंदे गटाचे नेते संतोष बांगर यांना नोटीस पाठवण्यात आल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
आमदार संतोष बांगर यांनी शुक्रवारी कळमनुरीमध्ये आयोजित एका कार्यक्रमांमध्ये मतदारांना आणण्यासाठी पैसे फोन पे ने पाठवा असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आमदार बांगर यांनी मतदारांना पैशाचं प्रलोभन दिल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार अजित मगर यांनी केली आहे.
त्यामुळे आता निवडणुक आयोगाच्या वतीने आमदार संतोष बांगर यांना आपल्या वक्तव्याचा खुलासा सादर करण्याची नोटीस बजावण्यात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पुढील 24 तासांमध्ये आमदार बांगर यांनी खुलासा सादर करावा, असं त्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.