जळगाव/मुंबई । गेल्या काही काळापासून तापमानात सतत बदल होताना दिसत असून अशातच राज्यातून गायब झालेली थंडी पुन्हा परतण्यास सुरुवात झाली आहे. जळगावसह महाराष्ट्राचा पारा तीन ते चार अंशांनी घसरलाय. शुक्रवारपासून राज्यात थंडी वाढण्यास सुरूवात झाली आहे. आज जळगावसह राज्याचा पारा आणखी घशरला असून पुढील दोन दिवसांत पारा आणखी घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे.
दोन आठवड्यांपासून गायब झालेली थंडी शुक्रवारी पुन्हा परतली. आज राज्यातील काही भागांत तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. काही ठिकाणी तापमान १० अंशांवर आले असून, जळगावात १०.४ अंश नोंदले गेले. दोन दिवसांत थंडीत वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात सकाळपासून थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशाच्या खाली घसरला आहे. पुढील काही दिवसांत राज्याच्या किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढलाय. राज्यात आकाश निरभ्र असल्याने स्वच्छ सूर्य प्रकाश जमिनीवर येत आहे. राज्यात किमान तापमानाचा पारा हळूहळू खाली घसरत असतानाच, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका थोड्याफार प्रमाणात जाणव्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्याच्या काही भागात सकाळच्या वेळी कडाक्याची थंडी जाणवत आहे. काही भागात धुक्याची चादर परसली आहे. उत्तर भारतात चढ-उतार होत असलेल्या थंडीचा अनुभव येत आहे, तर दक्षिणेकडील प्रदेशात कमाल तापमान स्थिर आहे. तापमानात घसरण झाली असली तरी शुक्रवारी दुपारनंतर अनेक भागात लक्षणीय उष्मा दिसून आला. येत्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.















Discussion about this post