पुणे । छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रात ‘टॅक्स फ्री’ (करमुक्त) करण्यात यावे अशी मागणी विविध संघटना आणि पक्षांकडून होत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात हा चित्रपट करमुक्त होऊ शकत नाही, असे फडणवीस यांनी सांगत त्याचे कारण दिले आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, वीरता आणि विद्धवता प्रचंड होती. परंतु इतिहासाने त्यांच्यावर अन्याय केला. आता त्यांच्यावर अतिशय चांगला चित्रपट आला आहे. ऐतिहासिक असा हा चित्रपट तयार झाला आहे. हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी होत आहे. परंतु महाराष्ट्रात करमणूक करच नाही. इतर राज्य जेव्हा एखादा चित्रपट करमुक्त (टॅक्स फ्री) करतात तेव्हा ते करमणूक कर माफ करतात.
परंतु महाराष्ट्राने 2017 सालीच करमणूक कर नेहमीसाठी रद्द केला. त्यामुळे आपल्याकडे करमणूक कर नाही. आता या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी आम्हाला अधिक काय करता येईल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करु.
Discussion about this post