जळगाव । सहकारी महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याप्रकरणी महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना आज रविवारी शहर पोलिसांनी चौकशीसाठी अटक केली. या कारवाईमुळे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. यापूर्वीच मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी डॉ. घोलप यांना निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत.
सहकारी महिला डॉक्टरचा विनयभंग आणि जन्म-मृत्यू विभागात पत्नीच्या जागेवर पतीला रूजू केल्याच्या आरोपावरून महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना गेल्या महिन्यात निलंबित केले होते. आता महिला डॉक्टरच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने डॉ. घोलप यांना अटक करण्यात आलीय. या प्रकरणी एका ३८ वर्षीय डॉक्टर महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, मनपाच्या शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये कार्यरत असताना डॉ. घोलप यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले. त्यांनी अश्लील इशारे करत मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, तसेच तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसुखाची मागणी करत तिचा विनयभंग केला, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. विजय घोलप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक केली आहे. याच दरम्यान, डॉ. घोलप यांच्या कार्यकाळात जन्म-मृत्यू नोंदणी विभागातही एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नियुक्त असलेल्या एका महिलेच्या जागी तिचा पतीच कर्तव्य बजावत असल्याची माहिती उघड झाली होती. या दोन्ही प्रकरणांची गंभीर दखल घेत तीन सदस्यीय चौकशी समितीने अहवाल आयुक्तांकडे सादर केला.















Discussion about this post