नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयाने आज आठवीच्या एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातील एका प्रकरणावरील वादावर सुनावणी केली. आठवीच्या पुस्तकातील न्याय व्यवस्थेवरील वादग्रस्त प्रकरणावरून सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सर्वोच्च न्यायालयात आज NCERT ला झापले.
तुम्ही संपूर्ण न्यायव्यवस्थेला भ्रष्ट म्हणू शकत नाही. अशा प्रकारचा मजकूर शालेय पुस्तकात असणे ही गंभीर बाब असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात वादग्रस्त प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीश यांनी बिनशर्त माफी स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केलेच. त्याशिवाय हे पुस्तक कसे प्रकाशित झाले, याची चौकशी केली जाईल असे सांगितले. आम्ही या संस्थेच्या प्रतिष्ठेला कलंकित होऊ देऊ शकत नाही, हे एक षडयंत्र असू शकते, असेही ते म्हणाले.
आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या पुस्तकात ‘न्यायपालिकेतील भ्रष्टाचार’ या मथळ्याखाली एक धडा छापण्यात आला होता. त्यातील मजकूर दिशाभूल करणारा असल्याचे सांगत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. संपूर्ण न्यायव्यवस्थेला अशा प्रकारे लक्ष्य करणे चुकीचे आहे, असे म्हणत सरन्यायाधीशांनी आपला संताप व्यक्त केला. या प्रकरणानंतर NCERT ने न्यायालयात माफी मागितली आहे. वादग्रस्त मजकूर असलेली सुमारे ३८,००० पुस्तके बाजारातून तातडीने मागे घेण्याचे आणि तो धडा हटवण्याचे आदेश न्यायालयाने NCERT दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, हे फौजदारी अवमानाचे प्रकरण आहे, कारण ते न्यायाच्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न आहे. म्हणून, शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण विभागाचे सचिव आणि एनसीईआरटी संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी.















Discussion about this post