मुंबई । राज्यात इंधन टंचाई आणि गॅस सिलिंडरच्या तुटवड्याबाबत चर्चा सुरू असताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधीमंडळात महत्त्वाची माहिती देत नागरिकांना घाबरू नये, असे आवाहन केले आहे. केंद्र सरकारकडून एलपीजी आणि पीएनजीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले असून गॅस पुरवठा सुरळीत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री भुजबळ म्हणाले की, गॅस पुरवठा हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार देशात एलपीजी आणि पीएनजीचा मुबलक साठा आहे. त्यामुळे नागरिकांनी घाईघाईने गॅस घेण्यासाठी रांगा लावू नयेत किंवा ब्लॅक मार्केटिंगला प्रोत्साहन देऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांनी आतापर्यंत 2,129 ठिकाणी तपासणी केली असून त्यातून 1,208 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत सुमारे 33 लाख 66 हजार 411 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात 23 गुन्हे दाखल करण्यात आले असून 18 जणांना अटक करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले. घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 852.50 रुपयांवरून 912.50 रुपयांपर्यंत वाढली आहे, तर व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1,720.50 रुपयांवरून 1,835 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
मंत्री भुजबळ यांनी प्रमुख गॅस कंपन्यांच्या प्रतिनिधींशीही चर्चा केली. यामध्ये Indian Oil Corporation, Hindustan Petroleum आणि Bharat Petroleum यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी एलपीजीचे दैनिक उत्पादन 9 हजार मेट्रिक टनांवरून 11 हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती दिली.
घरगुती गॅसचा पुरवठा झाल्यानंतर उरलेला गॅस विविध क्षेत्रांना प्राधान्याने देण्यात येणार आहे. त्यामध्ये रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक सेवांना 100 टक्के प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच रेल्वे, हवाई वाहतूक आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित उपहारगृहांना 70 टक्के पुरवठा केला जाईल. याशिवाय औषध उद्योग आणि बीज प्रक्रिया उद्योगांना 50 टक्के गॅस पुरवठा देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून गॅस पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केले.















Discussion about this post