मुंबई । लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच महायुतीमधील मतभेद समोर येऊ लागले आहेत.कालच अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या जागावाटपाबाबत वक्तव्य केलं. “आपण महायुतीमध्ये आलो, तेव्हा त्यांनी 80-90 जागा देण्याचा शब्द दिलेला. विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळाला पाहिजे” “लोकसभेसारखी विधानसभेला खटपट नको, असं भुजबळ म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत नाराजीचा सूर पसरला आहे.
यातच भाजप नेते निलेश राणे यांनी X अकाउंटवरून (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. छगन भुजबळांना आवरलं पाहिजे, भुजबळ नेहमीच भाजपला डिवचण्याचं काम करतात. त्यांची ही भुमिका त्यांची बरोबर नाही, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं? असा सवाल देखील निलेश राणे यांनी उपस्थित केला. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही, असंही राणे म्हणाले.
आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे, युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही. आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठ सूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही, असा इशाराही निलेश राणे यांनी भुजबळांना दिला आहे.
भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे, असंही निलेश राणे म्हणाले. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील छगन भुजबळांच्या विधानावर भाष्य केलं आहे. महायुतीत भाजप हा मोठा भाऊ असल्याने अधिक जागा लढेल, मात्र आम्ही मित्र पक्षांचा सन्मान ठेवू, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय दिसला. पण निवडणुकीच्या निकालापूर्वीच नेत्यांमध्ये वादाच्या ठिगण्या पडत असल्याने विधानसभेत नेमकं काय होणार? तिन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार की, ‘एकटा चलो’चा निर्णय घेणार, याची उत्सुकता अनेकांना आहे.
Discussion about this post