डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधारकार्ड तयार केल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार अडचणीत येणार आहेत. कारण बोगस आधारकार्डप्रकरणी रोहित पवारांविरोधात दक्षिण मुंबईत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप पदाधिकारी धनंजय वागस्कर यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
मतदारयाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी बनावट आधारकार्ड कसं तयार केलं जातं याचं प्रात्यक्षिक करुन दाखवलं होतं. त्यानुसार बनावट आधार कार्ड तयार करुन कशा पद्धतीनं पुरावे उभे करून मिटवलेही जाऊ शकतात, हे सांगितले होत. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो वापरुन अवघ्या 20 रुपयांमध्ये आधारकार्ड बनवून दाखवलं. अशीच आधारकार्ड दुबार मतदार आयडी बनवण्यासाठी वापरल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. मात्र आता डोनाल्ड ट्रम्पयांचं बोगस आधार कार्ड बनवणं त्यांना भोवणार आहे.
रोहित पवार यांचा फडणविसांना टोला
बोगस मतदार नोंदण्यासाठी बनावट आधार कार्ड कसं तयार केलं जातं याचा पत्रकार परिषदेत मी डेमो दाखवला. याची गृहविभागाने चौकशी केली आणि आधारकार्ड बनावट असल्याचं निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करणार असल्याचं समजलं. आता यावर हसावं की रडावं हेच कळेना. जर मीच स्वतः डेमो देऊन आधारकार्ड बनावट असल्याचं सांगत असेल तर आधारकार्ड खरं की बनावट याची १५ दिवस चौकशी करण्याची मुळातच गरज काय होती? एवढा रिकामा वेळ गृह विभागाकडे कसा आहे?
असेलच तर डॉ. संपदा मुंडे, सोमनाथ सूर्यवंशी, महादेव मुंडे, संतोष देशमुख, महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रकरण यासह अशा कितीतरी घटना आहेत ज्यामधील SIT चौकशी किंवा पोलीस तपास पुढे सरकत नाही. अशा प्रकरणात गृह विभागाने चौकशी करण्यासाठी आपला वेळ खर्च करावा. आपण अभ्यासू नेते आहात आणि त्याचा कायमच आदर आहे, पण आज आपल्या सल्लागारांना समज देण्याची आणि गृहविभागाने रिकामटेकडेपणा सोडून कामावर लक्ष देण्याच्या सूचना देण्याची गरज आहे, असे रोहित पवार यांनी पोस्ट करत म्हंटले होते.















Discussion about this post