जळगाव: मेहरूण तलावाच्या काठावर सुबोनियो पक्षीघर परिसरात ‘फुलपाखरू उद्यान’ साकारण्याच्या उद्देशाने मराठी प्रतिष्ठानतर्फे सुरू करण्यात आलेल्या ५०० फुलझाडांच्या वृक्षारोपण उपक्रमास आज जळगाव येथील मानुधने परिवाराचा मोलाचा हातभार लाभला.
चि. सिद्धांत मानुधने यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आजी प्रा. पूनम मानुधने (माजी उपप्राचार्य, मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव), स्नुषा सौ. स्मिता मानुधने आणि कुटुंबीयांच्या वतीने १०१ फुलझाडांचे दान मराठी प्रतिष्ठानला करण्यात आले. याच फुलझाडांचे वृक्षारोपण आज सकाळी १० वाजता सुबोनियो पक्षी घर परिसरात करण्यात आले.
कार्यक्रमात मानुधने परिवाराने स्वतः झाडांची लागवड केली. मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे,विश्वस्त सौ निलोफर देशपांडे,डॉ सविता नंदनवार, प्रा.कल्पना नंदनवार यावेळी उपस्थित होते.
पक्षी व फुलपाखरांसाठी उपयुक्त, रंगीबेरंगी फुलझाडे या परिसरात लावली जात असून यामुळे परिसराचा हरित सौंदर्य व जैवविविधता वृद्धिंगत होणार आहे. ‘फुलपाखरू उद्यान’ हे जळगावकरांसाठी एक आकर्षक आणि पर्यावरणपूरक जागा ठरणार असून, नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मराठी प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
Discussion about this post