मुंबई । राज्य सरकारने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात सुरू झालेल्या काही महत्त्वाकांक्षी योजना बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘माझी शाळा’, ‘आनंददायी शाळा’, ‘आनंदाचा शिधा’ यांसारख्या योजनांना ब्रेल लागला आहे. यानंतर आता ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ही ठप्प झाल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे या योजनेचे भवितव्य काय, याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
ही योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आली होती आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी ती मोठा दिलासा मानली जात होती. राज्यातील हजारो ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेअंतर्गत तीर्थयात्रेसाठी अर्ज केले होते. मात्र सध्या अर्ज प्रलंबित राहिल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज प्रलंबित असल्याचे दिसत आहे. विशेषतः जालना जिल्ह्यात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला होता. येथे एकूण 5,722 अर्ज प्राप्त झाले; त्यापैकी केवळ 929 अर्जांना मंजुरी मिळाली आहे. तब्बल 4,793 अर्ज अद्याप प्रलंबित किंवा छाननीच्या टप्प्यात आहेत. मंजूर झालेल्या 1,239 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष तीर्थयात्रेसाठी कधी बोलावले जाईल, याचीही स्पष्टता नाही.
ही योजना शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात सुरू झाली आणि सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र अलीकडच्या काळात मंजुरी प्रक्रिया मंदावल्याचे दिसत आहे. दरम्यान, आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असल्याने या प्रश्नावर सभागृहात चर्चा होण्याची शक्यता आहे. काही राजकीय वर्तुळांत या योजना बंद करण्यामागे अंतर्गत राजकीय मतभेद कारणीभूत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. महायुतीत सर्व काही सुरळीत नसल्याचे संकेत यामधून मिळत असल्याचे बोलले जात आहे. मात्र सरकारकडून अधिकृतरीत्या योजना बंद झाल्याची घोषणा झालेली नाही.















Discussion about this post