मुंबई । शिवसेनेच्या एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे या दोन्ही गटातील आमदारांना पात्र ठरवणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या १० जानेवारीच्या निकालास दोन्ही गटांनी कोर्टात आव्हान दिले आहे. आपण काढलेला ‘व्हीप’ अध्यक्षांनी अधिकृत ठरवला. मात्र तो डावलणाऱ्या ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्र ठरवले नाही. हा निर्णय अयोग्य असल्याचा अारोप करत शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर २२ जानेवारीला सुनावणी होईल.
तर शिवसेना पक्षाची २०१८ ची घटना अनधिकृत ठरवत ‘पक्षप्रमुख’ पदावर आक्षेप घेणाऱ्या अध्यक्षांच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शिंदे गटाला पात्र ठरवण्याचा नार्वेकरांचा निर्णय न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान करणारा व संविधानाची पायमल्ली करणारा आहे. त्यांचा निर्णय रद्द करून शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवावे, अशी मागणी केली आहे. ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
दुसरीकडे, अॅड. राहूल नार्वेकर मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत. ‘मी दिलेला निर्णय पूर्णपणे न्यायाला धरुन आहे. यात सर्वोच्च न्यायालयांच्या निर्देशांचे उल्लंघन झालेले नाही. कारण न्यायालयाने शिंदे गटाचे भरत गोगावले यांचे प्रतोदपद बेकायदा ठरवलेले नव्हते. तसेच मला नेतृत्व, बहुमत व पक्षघटनेच्या आधारे खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्यास सांगितले होते. मी निवडणूक आयोगाच्या हवाल्याने पक्ष कुणाचा ते ठरवले.’















Discussion about this post