भुसावळ | भुसावळ नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ ‘अ’ मधील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अनिता सतीश सपकाळे यांना मोठा धक्का बसला आहे. धुळे येथील अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीने त्यांचा ‘टोकरे कोळी’ अनुसूचित जमातीचा जातदावा अवैध ठरवत जात वैधता प्रमाणपत्र नाकारले आहे. तसेच उपविभागीय अधिकारी, जळगाव यांनी यापूर्वी दिलेले मूळ जात प्रमाणपत्र रद्द करून ते तातडीने जप्त करण्याचे आदेश दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
भाजपच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या अनिता सपकाळे यांनी अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धुळे येथील समितीकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर समितीने पोलिस दक्षता पथकाच्या मदतीने सखोल चौकशी केली. या तपासादरम्यान अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये गंभीर विसंगती आढळून आल्याचे समितीने नमूद केले आहे.
चौकशीत अनिता सपकाळे यांच्या वडिलांच्या १९७० सालच्या शालेय दाखल्यात ‘हिंदू सूर्यवंशी कोळी’, तर काकांच्या १९७८ सालच्या शालेय नोंदीत ‘हिंदू ओबीसी’ असा उल्लेख आढळला. या दोन्ही नोंदी अर्जदाराने केलेल्या ‘टोकरे कोळी’ अनुसूचित जमातीच्या दाव्याशी विसंगत असल्याचे समितीच्या निदर्शनास आले.
समितीने आपल्या निर्णयात नमूद केले की, ‘सूर्यवंशी कोळी’ ही जात १९९५ पासून विशेष मागास प्रवर्गात (SBC) समाविष्ट करण्यात आली असून त्यापूर्वी ती इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गात होती. ही जात कधीही अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट नव्हती. त्यामुळे उपविभागीय अधिकारी, जळगाव यांनी १ सप्टेंबर २०२३ रोजी जारी केलेले टोकरे कोळी जमातीचे मूळ जात प्रमाणपत्र रद्द करून ते जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
धुळे येथील अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष प्रदीप पोळ, सदस्य सचिव स्नेहल गोवेकर आणि वरिष्ठ संशोधन अधिकारी निलय राठोड यांच्या त्रिसदस्यीय समितीने हा निर्णय दिला आहे.
या निर्णयामुळे राखीव जागांसाठी सादर करण्यात येणाऱ्या जातदाव्यांची काटेकोर पडताळणी केली जात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दरम्यान, भुसावळमधील भाजपच्या नगराध्यक्षांच्या जातदाव्याबाबतचा वाद अद्याप चर्चेत असतानाच नगरसेविका अनिता सपकाळे यांचा जातदावाही फेटाळण्यात आल्याने स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.















Discussion about this post