पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर, राज्याच्या नेतृत्वाची धुरा कोणाकडे जाणार या प्रश्नाचे अखेर उत्तर मिळाले आहे. भाजप विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी सुवेंदू अधिकारी यांची एकमताने निवड करण्यात आली असून, उद्या सकाळी ११ वाजता ते बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
भाजपच्या नवनियुक्त आमदारांची बैठक आज कोलकाता येथे पार पडली. या बैठकीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी उपस्थित होते. निवडीची प्रक्रिया स्पष्ट करताना अमित शाह म्हणाले की, “विधीमंडळ नेतेपदासाठी एकूण ८ प्रस्ताव सादर करण्यात आले.
विशेष म्हणजे, या सर्व प्रस्तावांमध्ये केवळ सुवेंदू अधिकारी यांच्याच नावाचा उल्लेख होता. इतर नावासाठीही वेळ देण्यात आला होता, मात्र दुसरे कोणतेही नाव समोर आले नाही. त्यामुळे शुभेंदू अधिकारी यांची बिनविरोध निवड करण्यात येत आहे.”
शुभेंदू अधिकारी यांनी या निवडणुकीत विक्रमी कामगिरी केली आहे. त्यांनी नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही जागांवरून विजय मिळवला असून, भवानीपूरमध्ये त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. २०२१ च्या निवडणुकीतही त्यांनी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींना धूळ चारली होती. सलग दोनदा तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वांना पराभूत केल्यामुळे अधिकारी यांचा पक्षातला दबदबा वाढला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुवेंदू अधिकारी थोड्याच वेळात राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतील आणि सत्ता स्थापनेचा दावा मांडतील. उद्या सकाळी ११ वाजता होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ‘बाहेरून आलेले नेते’ ही टीका खोडून काढत भाजपने शुभेंदू यांच्यावर विश्वास दाखवून बंगालमध्ये एका नव्या युगाची नांदी केली आहे.















Discussion about this post