महाराष्ट्रासह देशातील अनेक ठिकाणी यंदा पावसाने दमदार हजेरी लावली. मान्सून या वर्षाच्या हंगामामध्ये तसे पाहायला गेले तर भारतात अगदी वेळेवर दाखल झाला होता व अगदी सुरुवातीपासून थोडा कालावधी सोडला तर जून महिन्यापासून तर आतापर्यंत पाऊस चांगल्या प्रकारे बरसला. सप्टेंबर महिन्यात मान्सून माघारी फिरतो किंवा पाऊस संपतो. मात्र यातच मान्सूनच्या परतीच्या प्रवासाबाबत हवामान विभागाकडून मोठी बातमी समोर आलीय.
भारतातील मान्सूनच्या परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लांबण्याची चिन्हे आहेत. यामुळे या महिन्यात देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.‘ला निना’मुळे तयार होणाऱ्या कमी दाबामुळे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान मान्सूचा परतीचा प्रवास लांबला तर याचा मोठा फटका हा खरिपांच्या पिकांना बसू शकतो, ऐन पिकांच्या काढणीच्या हंगामात पाऊस झाल्यास मोठं नुकसान होऊ शकतं. मात्र दुसरीकडे लांबलेल्या मान्सूनचा फायदा हा रब्बी पिकांसाठी होऊ शकतो. रब्बी हंगामातही पाऊस पडल्यास उत्पादन चांगलं होण्याची शक्यता आहे.
दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे, हवामान खात्याकडून आज राज्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी वादळाची देखील शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात देखील आज शनिवारी दुपारनंतर पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झाला आहे. आज जळगाव जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी केला आहे.















Discussion about this post